पुणे (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात शिवसेनेच्या मंत्र्याचे नाव समोर आले आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपने आक्रमक भूमिका घेत चौकशीची मागणी केली आहे. परंतु, या प्रकऱणात पोलिसांकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेले नाही. याबाबतचे कारण परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिले आहे. पूजा चव्हाणच्या कुटुंबियांकडून अद्याप कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी याप्रकऱणी अकस्मात मृत्यू अशी नोंद केलेली आहे. त्यामुळे तपास येथेपर्यंतच सीमीत झाला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पूजा आपला चुलत भाऊ आणि आणखी एका मित्रासोबत महमंदवाडी भागातील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. याच ठिकाणी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत तिने आत्महत्या केली होती. या प्रकरणात शिवसेनेच्या  मंत्र्याचे नाव समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संबंधित तरुणीचे आत्महत्या करण्यापूर्वीचे तसेच आत्महत्या केल्यानंतरचे काही फोन कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहेत. यावरून भाजपने संबंधित मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. परंतु, कुटुंबियांनी तक्रार दाखल न केल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.