गोकुळमधल्या सत्तांतराच्या झंझावातापासून ‘गडहिंग्लज’ दूर का ?…

0
639

गडहिंग्लज (प्रकाश चोथे) :  जिल्ह्याच्या राजकारणाची शिखरसंस्था असणाऱ्या ‘गोकुळ’वरच्या माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सुमारे २५ वर्षाच्या एक हाती सत्तेविरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सोबतीने प्राणपणाची लढाई केली. २१ पैकी तब्बल १७ जागा जिंकत झंझावाती सत्तांतर घडवून आणले; पण, सतेज पाटील यांचे विश्वासू शिलेदार विद्याधर गुरबे यांच्यासह महाबळेश्वर चौगुले आणि खासदारपुत्र वीरेंद्र मंडलिक हे तिघे मात्र ‘मागे’ राहिले. सरसकट सर्वांना एकत्र घेवून वाहिलेला हा झंझावात या तिघांना वगळून पुढे गेला खरा; पण त्यामुळे ‘गडहिंग्लज’ही या सत्तेपासून दूर राहिले.

मुळातच गोकुळच्या सत्तेत गडहिंग्लजची पाटी आधीचं कोरी होती, पण दोन्ही गटाकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्याने उमेदवारीच्या संधी वाढल्या. ती संधी पदरात पाडून घ्यायला तालुक्यातील अनेकांनी ‘फिल्डींग’ लावली. ताकत दाखवली. पण आघाडीने दिलेल्या उमेदवारांना निवडून आणण्याचा आदेश दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पाळणे भाग होते. उमेदवारांसह दोन्ही आघाडीच्या नेत्यांना सर्वात जास्त भीती कशाची वाटली असेल तर ती ‘क्रॉस व्होटींग’ची..! गडहिंग्लज येथील ठरावधारकांच्या मेळाव्यात बोलताना नामदार मुश्रीफ यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, आम्हाला मत देणार असाल तर ते ‘पॅनल टू पॅनल’ द्या. एखादं दुसऱ्याला देणार असाल तर तुमचे मतचं नको.

पण तरीही क्रॉस व्होटींग हे झालंच. ‘पॅनल टू पॅनल’चा नारा दिला असतानाही वीरेंद्र मंडलिक यांच्यासह गुरबे आणि चौगुले यांना मिळालेली मते १६८५ ते १६९६ या दरम्यान आहेत. पण याच आघाडीच्या इतर विजयी उमेदवारांना मिळालेली मते ही संभाजी पाटील आणि प्रकाश पाटील या दोघांचा अपवाद वगळता १८१४ ते १९८० च्या दरम्यान आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच गुरबे, मंडलिक आणि चौगुले हे १७, १८, १९ व्या नंबरवर फेकले गेले आणि शेवटपर्यंत तिथंच राहिले. त्यात अपवाद फक्त सहाव्या फेरीचा.

यावरून क्रॉस व्होटींगचा फटका या तिघांनाही सुरुवाती पासून शेवटपर्यंत बसला आहे असेच दिसून येते. मग प्रश्न उरतो… तो या तिघांनाच का?

वीरेंद्र मंडलिक हे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र आहेत. विद्याधर गुरबे हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ते आहेत तर महाबळेश्वर चौगुले हे राजकारणातील निष्कलंक, अजातशत्रू असे व्यक्तिमत्त्व आहे. मग बाकी सगळ्यांनी लावलेल्या ताकतीमध्ये या तिघांची ताकत कुठे कमी पडली..? विजयाच्या गुलालाचा धुरळा खाली बसल्यावर आघाडीचे नेते यावर विचारमंथन निश्चितच करतील मात्र इतका मोठा सत्तांतराचा झंझावात वाहूनही विजयाचा गुलाल ‘गडहिंग्लज’वर पडला नाही याची खंत गडहिंग्लजकरांना लागून राहील.