आहेर पाकिटात ५१ किंवा १००१, का टाकतात : ‘वरच्या’ १ रुपयाची गोष्ट..!

0
145

कोल्हापूर (संदीप घाटगे) : काल रिझर्व्ह बँकेने डीजिटल रुपया बाजारात आणला. आणि या बदलत्या जगाची दिशा भविष्यात काय असू शकते याची कल्पना आपण करू शकतो. या आधुनिक जगात काही अश्या गोष्टी आहेत ज्याचे कुतूहल सर्वांनाच असते पण त्या मागची भावना मात्र बऱ्याचदा लक्षात येत नाही. यापैकी शुभ कार्यासाठी पाकिटात टाकली जाणारी रक्कम होय.

अनेकदा आपण लग्न समारंभासाठी वा शुभ कार्यसाठी जातो त्यावेळेस आपल्याला हमखास आढळणारी गोष्ट म्हणजे प्रेझेंट पाकिटामध्ये घातलेली रक्कम. ही रक्कम रुपये ५१ १०१,२०१,५०१, किंवा १००१ या पद्धतीने पाहायला मिळते.

आजच्या ऑनलाईन पेमेंटच्या जगात प्रेझेंट पाकिटात नाणं हे १ रुपयांचंच का असतं? त्यामागे काय तर्कशास्त्र आहे किंवा काय शास्त्र असतं ? असे प्रश्न पडतात. या प्रथेची सुरुवात कुठून झाली? आणि त्याचं महत्व काय आहे ? हे समजून घेवूया…

१). ‘शगुन’ म्हणून भेट दिल्या जाणाऱ्या या पाकिटावर १ रुपयाचं नाणं चिकटवण म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात म्हणून मानलं जातं. भारताने जगाला दिलेल्या शून्यापासून जरी गणनेची सुरुवात होत असली तरी शून्य हा मानसिकदृष्ट्या नकारात्मक आकडा मानला जातो. या मानसिकतेमुळेच प्रचलित झालं असावं असे बोलले जाते. असो. जेव्हा यजमान हे पाकीट उघडून बघेल तेव्हा त्या गणनेची सुरुवात शून्यापासून न होता १ पासून व्हावी हे या प्रथेमागचं कारण मानलं जातं.

२) १ रुपयाचं नाणं हे समोरच्या व्यक्तीला दिलेलं एक छोटं कर्ज असतं असं सुद्धा काही लोक मानतात. आपण जवळची समजणाऱ्या व्यक्तीने आपल्याला ते कर्ज देण्यासाठी परत भेटावं ही भावना यामागे असते असं सांगितलं जातं. त्यामुळे हेच कारण असावं की, पाकिटशिवाय एखाद्या व्यक्तीला भेट म्हणून दिली जाणारी रक्कम ही रुपये ५०१, १०१ किंवा ५१ अशी असते. तो वरचा १ रुपया म्हणजे “आपण परत भेटू” हे सांगणारा असतो असं म्हणतात.

३) खेडेगावात अजूनही बक्षीसाचे आकडे माईकवरून जाहीरपणे सांगितले जातात. नाणं हे धातूपासून तयार केलं जातं आणि धातू हे पृथ्वीपासून मिळतात. हिंदू धर्मात पृथ्वीला आई मानलं जातं आणि म्हणून त्याकडे ‘आईचा आशीर्वाद’ म्हणून देखील बघितलं जातं.धनत्रयोदशीच्या दिवशी धातूने तयार केलेलं लक्ष्मीचं नाणं विकत घेण्याची प्रथा ही याच विचाराने लोकप्रिय झाली असावी. लक्ष्मीचं नाणं हे आपल्या घरी सुख, समृद्धी घेऊन येईल ही यामागची सदिच्छा असते.

४) कोणत्याही प्रिय व्यक्तींना भेट स्वरुपात दिली जाणारी रक्कम ही विभागली जाऊ नये म्हणून कदाचित रुपये १०१, २०१, ५०१ ही रक्कम ठरवली गेली असंही सांगितलं जातं. भेट किंवा आहेर स्वरुपात दिली जाणारी कोणतीही रक्कम ही दोन भागात पूर्णांकात विभागली जाऊ शकत नाही तसंच आपल्यातील प्रेम हे विभागलं जाऊ नये हे ही यामागची भावना असल्याचं काही लोक मानतात.