मोकाट जनावरांचा त्रास कोल्हापूरकरांनी का सोसायचा ? :  नागरी कृती समितीचा सवाल

0
107

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात मोकाट फिरणाऱ्या भटक्या जनावरांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. सदर मागणीचे निवेदन आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा कोल्हापूरकरांनी का सोसायचा, महापालिका प्रशासन कारवाई का करत नाही असा सवाल निवेदनात करण्यात आला.

निवेदनात म्हटले आहे की, शहरात मध्यवस्तीत रहदारीच्या ठिकाणी अगदी महापालिका इमारती नजीकही गाय, म्हैशी, छोटी वासरे मोठे बैल (वळू) मोकाट सुटलेली असतात. रस्त्यातच कळपाने नागरिकांच्या अंगावर धावतात, व्यापाऱ्यांचे नुकसान करतात. बऱ्याच वेळा ही जनावरे गर्दीच्या ठिकाणी अचानक उधळतात. त्यात काही नागरिक जखमीही झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा.

या निवेदनावर कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृति समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, भाऊ घोडके, संभाजी जगदाळे, माणिक मंडलिक, चंद्रकांत सूर्यवंशी, महादेव पाटील, महादेव जाधव, राजाराम सुतार यांच्या सह्या आहेत.