कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवसेनेला कुठे डावलले हे दुधवडकरांनी लेखी द्यावे, अशा प्रकारचे वक्तव्य पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी केले आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याशी नेहमीच संपर्क साधत असाल तर त्यांच्या माघारी शिवसेनेच्या नगरसेवकांना जेवणासाठी बोलवून त्यांच्याकडून समित्यांसाठी परस्पर नावे मागण्यामागचे कारण काय ? असा सवाल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ना. सतेज पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कॉंग्रेसला जिल्हा नियोजन समितीमधून ११ कोटी आणि नगरविकास विभागाकडून १० कोटी, राष्ट्रवादीला २५ कोटी निधी दिला आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेलाही १५ कोटींचा निधी हा मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. याचे श्रेय पालकमंत्र्यांनी घेऊ नये. शिवसैनिकांना पदे आणि निधी मिळाल्याचे श्रेयही शिवसेना नेत्यांचेच असल्याचे प्रतिपादन राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत यासह नगरविकास मंत्री हे देखील शिवसेनेचे आहेत. त्यामुळे शहराच्या विकासासाठी मी पाठपुरावा केला आणि निधी दिला गेला. याचे दुख: पालकमंत्री पाटील यांना झाले. याच निधीला विरोध करण्यासाठी पालकमंत्री पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांना का भेटले ? जिल्हा नियोजन समितीमधून महापालिकेच्या अनुसूचित जाती जमातीच्या ११ मतदारसंघासाठी ११ कोटींचा निधी मंजूर झाला. तो निधी फक्त कॉंग्रेसच्या नगरसेवक, पदाधिकारी यांना दिला गेला. यावेळी पालकमंत्र्यांना महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीची आठवण झाली नाही काय ? असा सवालही केला.

गोकुळमध्येही शासन नियुक्त सदस्य म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नियुक्तीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. असे असताना पुन्हा तांत्रिक बाबीचे कारण काढून नियुक्ती रखडण्यात का आली ? दुजाभाव नसेल तर मुरलीधर जाधव यांची नियुक्तीचा विषय तात्काळ मार्गी लावावा.

शिवसेनेला डावलले असल्यास संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी लेखी द्यावे, हे पालकमंत्री सतेज पाटील यांनी वक्तव्य केले. दुधवडकर हे शिवसेनेचे संपर्कप्रमुख असून ते लेखी द्यायचे असेल तर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांकडे आणि वरिष्ठ नेत्यांकडे देतील. त्यामुळे पालकमंत्र्यांनी पाटील यांनी संपर्कप्रमुखांकडे लेखी तक्रार मागणे हास्यास्पद आहे.

पालकमंत्री पाटील यांच्यावर शिवसेनेचे एकप्रकारे उपकारच आहेत. पण, काही गद्दारांना सोबत घेवून त्याच शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. शहराचा विकास साधण्याचे काम शिवसेना करत असून, आगामी काळातही शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकासासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पालकमंत्री पाटील यांनी शिवसेनेच्या आडवे येण्याची भूमिका टाळावी, असा सल्लाही राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  दिला आहे.