मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा का देत नाहीत ? वाट कसली पाहात आहेत? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

नारायण राणे म्हणाले, एवढ्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरेंनी एक क्षणही मुख्यमंत्रीपदावर राहायला नको होते; पण ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. एकनाथ शिंदेंना वारंवार दिलेली अपमानाची वागणूक आणि न पाळलेली आश्वासने यातून त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि त्यातून त्यांनी आज बंड केले. एकनाथ शिंदे नामधारी नगरविकास मंत्री होते. मातोश्रीच्या बाहेर कुणालाही त्याचे अधिकार नाहीत. शिवसेनेच्या वाट्याचे सरकार फक्त मातोश्री आणि त्यांच्या नातेवाइकांसाठीच होते.

बाळासाहेब ठाकरेंनी ४८ वर्षांहून जास्त काळ शिवसेना पक्ष सांभाळला, वाढवला. शिवसैनिकांना प्रेम आणि विश्वास दिला. याच्याउलट मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख असताना अडीच वर्षही पक्ष सांभाळता आला नाही. सहकाऱ्यांना विश्वास देता आला नाही. प्रेम तर सोडाच. मातोश्रीच्या पिंजऱ्यातून बाहेर पडायचे नाही आणि फक्त आदेश द्यायचे. त्यामुळेच गुदमरलेले शिवसैनिक, मंत्री आणि आमदारांनी त्यागाच्या भूमिकेतून हा बंड केला आहे, असे नारायण राणे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजी नाट्यावरून सध्या राज्यात मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. भाजपासोबत सरकार स्थापन करावे, अशी अट शिंदेंनी उद्धव ठाकरेंना घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सरकार दोलायमान अवस्थेत असताना दुसरीकडे विरोधकांकडून ही संधी साधत सरकारवर टीका केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर राणे यांनी निशाणा साधला आहे.