राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत ? : शिवसेना

0
180

मुंबई (प्रतिनिधी) : डेहराडून येथे जाण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुंबई विमानतळावर गुरुवारी पोहोचले. मात्र, सरकारी विमानातून प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली. त्यामुळे विमानात आसनस्थ झालेल्या राज्यपालांना १५ मिनिटांनी विमानातून उतरावे लागले. यावरून विरोधी पक्ष भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारवर टीका करत राज्यपालांचा हा अपमान असल्याचा आरोप केला. या आरोपाला ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने उत्तर देत भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यपालच काय, मुख्यमंत्र्यांनाही खासगी कामासाठी सरकारी विमान वापरता येणार नाही. मुख्यमंत्री कार्यालय नियमानेच वागले. यात राज्यपालांशी झगडा करण्याचा प्रश्न येतोच पुठे ? महाराष्ट्राचे राज्यपाल हे सन्माननीय व्यक्ती आहेतच. पण ते ज्या पदावर सध्या विराजमान आहेत, त्या पदाचा मान व प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी त्यांचीही तितकीच आहे. राज्यपालांना भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर नाचायला भाग पाडले जात आहे व त्यात राज्यपालांचेच अधःपतन सुरू आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. श्री. कोश्यारी हे अनेक वर्षे राजकीय क्षेत्रात काम करीत आहेत. विधिमंडळ तसेच संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी काम केले. केंद्रात मंत्री झाले. उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले तरी ते इतके चर्चेत कधीच आले नव्हते. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आल्यापासून हा साधा माणूस या ना त्या कारणाने चर्चेत किंवा वादात राहिला आहे. वाद निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही व राज्यपालांनी तर शहाण्यासारखे वागावे, असे संकेत असतानाही महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत, हा प्रश्नच आहे, असे अग्रलेखात म्हटले आहे.