विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी

महाराष्ट्रातील वाचाळवीरांनी लोकांना अक्षरश: वीट आणला आहे. सर्वच पक्षांमध्ये रोज नवनवे वाचाळवीर उदयास आलेले पाहावयास मिळत आहेत. राजकीय पक्षातील वरिष्ठ नेत्यांना किंवा पक्ष श्रेष्ठींना या वाचाळवीरांना आवरावे असे वाटत नाही का? असा प्रश्न सामान्यांना पडलेला आहे.

वाचाळतेच्या बाबतीत ‘जात्यातले सुपात आणि सुपातले जात्यात’ याचा जनता अनुभव घेत आहे. मंत्र्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्याची प्रतिमा डागाळली गेली आहे. सत्ताधारी पक्षातील आणि इतर राजकीय पक्ष व संघटनेतील वाचाळवीरांना त्वरित वेसण घालणे आवश्यक आहे. या बाबतीत सर्वच पक्षांची अवस्था ‘उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे’ अशी तर झाली नाही ना? असे विचारले तर चुकीचे ठरणार नाही.

एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढण्यात आणि वादग्रस्त विधाने करण्यात सगळ्याच पक्षाचे अनेक नेते आघाडीवर असतात. त्यात राज्यपाल हे देखील मागे नाहीत. राजकीय वाचाळवीरांच्या बेताल बडबडीमुळे भाषेचा स्तर खालावत चालला आहे, हे सामन्यांचे मत दुर्लक्षून चालणार नाही.

शिवराळ भाषा, बघून घेण्याची धमकी, थोर राष्ट्रपुरुषांचा, देवदेवतांचा अवमान करणारी वक्तव्ये करून गदारोळ उठवणारे मोकळे होतात आणि ‘त्या’ वादग्रस्त विधानावर वातावरण चिघळवत ठेवण्याचा प्रयत्न विविध घटकांतून केला जातो, हे दुर्दैवी आहे.

सभ्य आणि सुसंस्कृत राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे. राज्यात अनेक सुसंस्कृत नेते होऊन गेले. राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांनी वैचारिक मतभेद बाळगूनही राजकारणापलीकडची मैत्री जोपासली. मैत्रीत आणि कौटुंबिक नातेसंबंधांत राजकारण येऊ न देण्याचे भान नेहमीच दाखवले. जुन्या काळातील अनेक नेत्यांनी वाचाळतेचे प्रदर्शन घडवले नाही. जुन्यांचा आदर्श हल्लीच्या राजकारण्यांनी आचरणात आणला तर राजकीय वातावरण कलुषित होणार नाही, पण हे मनावर कोण घेणार हा खरा प्रश्न आहे. कारण प्रत्येकाची सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे.

सभांमधून भाषणे करताना सगळेच नेते राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा दाखला देतात; पण त्यांच्या विचारांचे आचरण केले पाहिजे असा उपदेश मात्र जनतेला करतात. सतत वादग्रस्त विधाने करुन, धर्म आणि संस्कृती वेठीला धरुन माध्यमांना चर्चेला आणि लोकांना चघळायला नवनवे मुद्दे देण्याचा ठेकाच बहुधा अनेकांनी उचलला असावा का? अशा वाचाळवीरांमुळे सामाजिक वातावरण ढवळून निघते. सामाजिक द्वेष वाढतो व शांतता धोक्यात येते, हे या वाचाळवीरांच्या लक्षात कसे येत नाही?

धार्मिक किंवा सांप्रदायिक प्रक्षोभक विधाने करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी स्वत:हून कारवाई करावयाचे म्हटले तरी राजकीय हस्तक्षेप आडवा येतो. त्यामुळे वाचाळवीरांना आळा कसा बसणार, हा प्रश्नच आहे. वाचाळवीर एकटेच नसतात. त्यांना पक्षातून अभय मिळत असल्याने ही मंडळी बेताल वक्तव्य करीत सुटतात. बहुदा वाचाळवीरांची फौज बाळगणे ही सर्वच राजकीय पक्षांची गरज बनली नाही ना? असा प्रश्न सामन्यांच्या मनात उपस्थित झाला, तर चुकीचा ठरणार नाही.

सगळ्या गदारोळात जनतेच्या प्रश्नांचा मात्र बळी जात आहे, याकडे दुदैर्वाने कोणाचेच लक्ष नाही. वाचाळवीरांमुळेच महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे गढूळ आणि कलुषित झाले आहे. वाचाळवीरांना वेळीच रोखले पाहिजे नाहीतर जनतेतून क्षोभ उफाळून आल्याशिवाय राहणार नाही.