विश्लेषण : श्रीधर वि. कुलकर्णी

केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर केली असून १ आणि ५ डिसेंबर रोजी अशा दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे या निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. तसे पहिले तर सत्ताधारी भाजपकडून अगोदरपासूनच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय आखाडे बांधण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत भाजप आपला गड राखणार की, आप व काँग्रेस पक्ष भाजपला जेरीस आणून सत्तांतर घडवून आणणार, याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे. शिवाय आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून गुजरात निवडणुकीकडे पाहिले जात आहे. गुजरातमधील भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी ‘आप’ने कंबर कसली आहे. त्याला काँग्रेस व इतर पक्षांची राजकीय रणनीती कशी असणार, यावर भाजपचे यशापयश अवलंबून आहे.

गुजरातमध्ये १८२ जागांसाठी निवडणूक होत असून, बहुमतासाठी ९१ जागा कोणत्याही पक्षाला जिंकाव्या लागणार आहेत. यावेळी भाजपने १८२ जागांपैकी १६० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गतवेळपेक्षा यंदाची पूर्णपणे वेगळी आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे २०१७ मध्ये गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होती, परंतु यावेळी ‘आप’देखील या लढतीत सहभागी होत  आहे. त्याचबरोबर पाटीदार आंदोलनाची धगही यावेळी शांत झाली आहे. आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा हार्दिक पटेलनेही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सध्याच्या राजकीय कोलाहलात भाजपच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि मोदींचा करिष्मा अजून टिकून आहे की नाही हे दाखवून देणारी असणार आहे.

सध्या गुजरातमध्ये भाजपचे भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी राज्यात कोणताही बदल होणार नसल्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत. भाजपशिवाय काँग्रेस आणि ‘आप’देखील रिंगणात आहे; मात्र दोन्ही पक्षांनी अद्याप मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. काँग्रेसबद्दल बोलायचे झाले, तर भरत सोळंकी, अर्जुन मोढवाडिया, शक्तिसिंह गोहिल हे पक्षात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ‘आप’मध्ये गोपाल इटालिया आणि इशुदान गढवी हे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.

यावेळी गुजरातच्या निवडणुकीवर. मोरबी पूल दुर्घटना, कर्मचाऱ्यांच्या समस्या, महागाई, बंदरात पकडलेली ड्रग्ज हे मुद्दे परिणाम करू शकतात. मोरबी पूल दुर्घटनेनंतर निवडणूक या मुद्द्याभोवतीच बंदिस्त झाली आहे. गेल्या २४ वर्षांपासून भाजपची सत्ता असल्याने पक्षाविरोधात अँटी इन्कम्बन्सीचाही प्रभाव आहे.

यावेळी गुजरात निवडणुकीत दोन सायलेंट चेहरे चर्चेत आहेत. जे निवडणुकीवर प्रभाव टाकू शकतात. यातील एक नाव ‘पाटीदार’चे नरेश पटेल यांचे आहे, तर दुसरे नाव कोळी समाजातील सोमाभाई गंडाभाई आहे. नरेश पटेल यांनी आतापर्यंत राजकारणात थेट प्रवेश केलेला नाही; परंतु ते गुजरातमधील ८५ लाख लेउवा पटेल समाजातील सर्वमान्य नेते मानले जातात. पटेल यांनी अनेकवेळा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षप्रमुखांशी चर्चा होऊ शकली नाही. दुसरीकडे सोमाभाई गंडाभाईही यावेळी गेम चेंजर ठरू शकतात. पाटीदारांनंतर गुजरातमध्ये कोळी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे.