आजरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सभासद व संस्थांनी हवे ते प्रतिनिधी निवडले आहेत. या बँकेचा चेअरमन कोण होणार हे २० तारखेच्या होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वानुमते ठरविले जाणार असून तो निर्णय मान्य असेल. असे मत जिल्हा बँकेचे चेअरमन ना. हसन मुश्रीफ यांनी वेळवट्टी (ता.आजरा) येथील सत्कार समारंभात केले. यावेळी नवनिर्वाचित संचालक सुधीर देसाई यांचा सत्कार आणि ठरावधारकांचे आभार असा कार्यक्रम वेळवट्टी येथील विविध संस्था, मंडळांच्या वतीने आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश पाटील होते.

यावेळी ना. मुश्रीफ म्हणाले, एकीकडे १५ लाख आणि नोकऱ्या घेऊन असणारे उमेदवार आणि एका बाजूला स्वाभिमानी असणारे कार्यकर्ते अशी निवडणूक झाली. मात्र विजय स्व. राजारामबापू देसाई यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाच झाला. जिल्हा बँकेचा कारभार चोख केला म्हणून पुन्हा आम्हाला संधी मिळाली. यापुढेही शेतकरी केंद्रबिंदू मानून काम केले जाईल असा विश्वास व्यक्त केला. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबत माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे अज्ञान आहे. ते म्हणतात विश्वासघात करून अशोक चराटींचा पराभव केला. मात्र, त्यांना माहीत नाही की आमच्या पॅनेलने सुधीर देसाई यांना उमेदवारी दिली. तेच आमचे उमेदवार होते मग विश्वासघात कसा? हे त्यांनीच सांगावे असे प्रतिपादन केले.

यावेळी आ. राजेश पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचा कारभार ना. मुश्रीफांनी अतिशय चांगला केला आहे. तेच पुन्हा अध्यक्ष होणे आवश्यक असल्याचे सर्व संचालकाचे मत आहे. आजरा तालुक्यातील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. या घळभरणीचे काम पोलीस बंदोबस्तखाली करू पण प्रकल्प पूर्ण करूच अशी ग्वाही दिली.

सुधीर देसाई म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ना. मुश्रीफ आणि सर्व ठरावधारकांनी जिल्हा बँकेत संचालक केले. या निवडणुकीत मुकूंद देसाई यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मी प्रामाणिकपणे बँकेत सर्वांना न्याय देईन. तालुक्यातील संस्थेचा कर्जपुरवठा सुरळीत व सुलभ होण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी स्मिता गवळी, वसंतराव धुरे, सभापती उदय पवार, एम.के.देसाई, मुकूंद देसाई, विष्णुपंत केसरकर, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ठरावधारक, ग्रामस्थ उपस्थित होते.