राशिवडे (प्रतिनिधी) : गोकुळ शिरगाव येथील अपघातात जखमी झालेल्या मातेचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नसल्याने तिच्या चार वर्षांच्या मुलाला कोणाच्या ताब्यात द्यायचे, अशी पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे. तसेच भविष्यात या अनाथ बालकाचे पालकत्व कोण स्वीकारणार?, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला आहे.

गोकुळ शिरगाव येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव जाणार्‍या मोटारीने धडक दिल्याने चार वर्षांच्या मुलासह माता गंभीर जखमी झाली होती. बेशुद्ध अवस्थेत महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलाकडून नाव, गाव अथवा नातेवाइकांची माहिती मिळू शकत नव्हती. डोक्याला इजा झाल्याने महिलेची प्रकृती दिवसेंदिवस अस्वस्थ बनत होती. सोमवारी दुपारी दोन वाजता मातेचा मृत्यू झाला. त्या मुलाची ओळख पटावी म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले होते; पण त्यास अजून तरी यश आल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्या बालकाला बालसंकुलात ठेवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

जर कोणी त्यांचे नातेवाईक असतील आणि त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली नाही, तर अनोळखी म्हणून सापडला अन् अनाथ म्हणूनच आयुष्यभर त्याला राहावे लागेल, अशी दुर्दैवी परिस्थिती या बालकावर येऊ नये यासाठी पोलिसांबरोबरच सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, अशी भावना सामाजिक कार्यकर्त्यातून व्यक्त होत आहे.