चंद्रकांतदादांना कुणी सांगितले आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली?

0
37

कराड (प्रतिनिधी) : चंद्रकांतदादांना कुणी सांगितले आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडली? आम्ही स्वप्ने पाहण्याचे काम करत नाही, आम्ही कृती करणारी माणसे आहोत, असा टोला अजित पवारांनी लगावला.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कराडमध्ये प्रीतीसंगमावर गेले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकार पडणार आहे, हे विरोधी पक्षांना सतत म्हणावेच लागते. सन १९९५ ते ९९ च्या काळात आम्ही ८० जण आमदार म्हणून निवडून गेलेले होतो. कार्यकर्ते सोबत राहण्यासाठी आणि आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये, यासाठी सारखे गाजर दाखवायचे काम करायचे असते. आता जाणार, आता जाणार म्हणत होते, पण महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष झाले की नाही.

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी या तिघांनी मिळून महाविकास आघाडी केलेली आहे. जोपर्यंत त्या तिघांचे आशीर्वाद महाविकास आघाडीच्या पाठीशी आहेत. ते मजबुतीने उभे आहेत, तोपर्यंत सरकारला काहीही होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगू शकतो. ते १०५ असताना त्यांना सरकारमध्ये कामाची संधी मिळालेली नाही हे त्यांचे खरे दुखणे आहे. त्यामुळेच सारखे काही ना काही काड्या पेटवायचे काम त्यांचे सुरू आहे.