मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकार कोसळल्यामुळे नव्या सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन सत्ता स्थापन झाल्यानंतर विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड होणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद अजित पवार यांच्याकडे येणार की जयंत पाटील यांच्याकडे, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

एकनाथ शिंदे गटाला सोबत घेऊन भाजप सत्ता स्थापन करण्यासाठी पुढे सरसावले आहे. मागील अडीच वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे सरकारला जेरीस आणलेले देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्यामुळे आता फडणवीस यांच्या जागी कोण येणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची अडीच वर्षांची कारकीर्द चांगलीच गाजली. मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझे प्रकरण, पेन ड्राईव्ह बॉम्ब, अनिल देशमुखांसह नवाब मलिक प्रकरण यांसह अनेक मुद्दांवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारी पिसे काढली. त्यामुळे आता नव्या सरकारलाही सळो की पळो करणारा नेताच पुढील विरोधी पक्षनेते असणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे  यांच्या गटात ३९ आमदार आहेत. हा गट भाजपला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सामील होणार आहे. त्यामुळे शिवसेनेकडे आता केवळ १६ आमदार उरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५३ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत. त्यामुळे सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आता विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीकडेच येणार, हे निश्चित आहे.

राष्ट्रवादीतील दोन नेत्यांपैकी एकाकडे ही अत्यंत महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. आक्रमक नेते म्हणून अजित पवार यांची ओळख आहे, तर जयंत पाटील यांच्याकडे संयमी नेते म्हणून पाहिले जाते. दोन्हीही नेत्यांना सभागृहाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. नव्या फडणवीस सरकारला त्यांच्याच शैलीत जेरीस आणण्यासाठी आक्रमक नेता म्हणून पवारांची निवड केली जाण्याची दाट शक्यता आहे. अजित पवारांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिल्यास जयंत पाटील यांच्यावर ही जबाबदारी येण्याची शक्यता आहे.