कोल्हापूर (श्रीकांत पाटील) : एकीकडे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते किरीट सोमय्यांनी १२७ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोप केला आहे. यामुळे जिल्ह्यासह राज्यात वातावरण तापून एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचेच नव्हे तर आता काँग्रेसच्या दोन नेत्यांचे घोटाळे भाजप बाहेर काढणार आहे. असा खळबळजनक दावा काल (सोमवार) पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून ‘ते ‘ काँग्रेसचे नेते कोण ? राज्यमंत्री की कॅबिनेट मंत्री ? आमदार आहेत की नेते आहेत ? अशा वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलयं.

भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी जिल्ह्याचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामध्ये १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करुन त्यांनी इडिकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात वातावरण तापले आहे. तर त्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार टीकास्त्र सुरू आहे. तर कोल्हापुरात काल तर भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

आतापर्यंत किरीट सोमय्यांशी शिवसेनेचे मंत्री अनिल परब, खासदार भावना गवळी, शिवसेना नेते प्रतापराव सरनाईक तसेच राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी गोटात अस्वस्थता पसरली आहे. तर भाजप विरोधी महाविकास आघाडी संघर्ष टिपेला पोहचला आहे. तर महाविकास आघाडीचा तिसरा घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष हा या सर्व घटनांपासून अलिप्त होता. या संदर्भातील आरोप प्रत्यारोपावर काँग्रेस नेत्यांनी मात्र दूर रहाणे पसंत केले होते.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवसेना, राष्ट्रवादी नव्हे तर आता काँग्रेसच्या ही दोन नेत्यांचे भाजप घोटाळे बाहेर काढणार असल्याचे विधान केल्यामुळे काँग्रेसमध्ये तर खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर राज्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे भाजपच्या रडारावर कोणते काँग्रेसचे नेते आहेत याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.