सचिन वाझे यांना शिवसेनेत कोणी आणलं..? : राज ठाकरे

0
168

मुंबई (प्रतिनिधी) : अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी. त्याचबरोबर ख्वाजा युनूस प्रकरणात १७ वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझे यांना शिवसेनेत कोणी आणलं, त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नेणारी ती व्यक्ती कोण होती, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून राज्यात खळबळ उडाली आहे. यावरून राज ठाकरे यांनी सवाल उपस्थित करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.   

राज ठाकरे म्हणाले की, गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले, असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कसून चौकशी होणे गरजेचं आहे. 

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याप्रकरणी पोलील अधिकारी सचिन वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीर सिंग यांना त्यांच्या पदावरून का हटवलं. त्यांची बदली का केली गेली हे अजून सरकारने सांगितलेलं नाही. सिंग यांचा काही संबंध होता का? त्यांचा त्यात सहभाग होता का? त्यांना त्या पदावरून बाजूला का केलं गेलं. जर त्यांचा सहभाग होता, तर मग त्यांची चौकशी का केली नाही, त्यांची बदली का केली गेली? सरकारने अंगावर आलेली गोष्ट दुसऱ्याच्या खांद्यावर टाकली, असे राज ठाकरे म्हणाले.