मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात  झालेल्या १२ हजार ७११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी झाली. त्यानंतर अंतिम निकाल  समोर आले आहेत. अनेक ठिकाणी प्रस्थापित  नेत्यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना अनपेक्षित कौल मिळाला आहे. कोणत्या पक्षाची किती ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आली याचा आकडा समोर आला आहे.  महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत जनतेने शिवसेनेच्या पारड्यात आपले मते टाकली आहेत.  

शिवसेनेने ३ हजार ११३ ग्रामपंचायतींवर भगवा फडकवत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपने २ हजार ६३२  ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी २ हजार ४०० ग्रामपंचायतीमध्ये  सत्ता मिळवत तिसऱ्यास्थानी आहे. काँग्रेसने पहिल्या क्रमांकाचा दावा केला असला, तरी त्यांची  १ हजार ८२३ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता आली आहे. तर राज ठाकरे  यांच्या मनसेने ३६  ग्रामपंचायती सत्ता मिळवत ग्रामीण भागात पाय पसरले आहेत. अपक्ष आणि स्थानिक विकास आघाड्यांनी २ हजार ३४४  ग्रामपंचायतीवर वर्चस्व ठेवले आहे.