मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनामुळे गेल्या वर्षी आयपीएलचे सामने परदेशात खेळविण्यात आले होते. मात्र, यंदा आयपीएलची सुरुवात ११ किंवा १४ एप्रिलला महाराष्ट्रातून होण्याची शक्यता आहे. अंतिम सामना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर कोरोनामुळे बीसीसीआयने आयपीएल एकाच राज्यात खेळवण्याचा निर्णय घेतला असून हे सामने महाराष्ट्रात होणार असल्याचे समोर आले आहे.  

आयपीएलच्या साखळी फेरीतील सर्व सामने महाराष्ट्रातील वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डी.वाय.पाटील स्टेडियम, नवीन मुंबई येथील रिलायन्स क्रिकेट स्टेडियम आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या पुण्यातील स्टेडियमवर होणार आहेत. तर बाद फेरीतील सामने अहमदाबाद येथील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार असल्याचे समजते. त्याचबरोबर आयपीएलचा अंतिम सामनाही येथेच रंगणार आहे.

दरम्यान, आयपीएलचा लिलाव १८ फेब्रुवारीला चेन्नई येथे होणार आहे. यावेळी तब्बल १३९ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. सर्व संघ मालक आणि अधिकारी यांच्या  उपस्थितीत हा लिलाव होईल. यात कोणत्या खेळाडूला किती रुपयांची बोली लागणार ? कोणत्या संघात स्थान मिळणार ? याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे.