राशिवडेतील रिंगरोड होणार कधी ? : ग्रामस्थांचा संतप्त सवाल

0
358

राशिवडे (प्रतिनिधी) :  राशिवडे येथील रिंगरोड होणार कधी ? हा प्रश्न दरवर्षी उसाच्या सीझनमध्ये ठरलेला आहे. उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अपघात होतो, मग एखादी बातमी येते. आज (शुक्रवार) याच रस्त्यावर एका उसाने भरलेल्या ट्रॉलीला अपघात झाला. परंतु, प्रशासन काही केल्या जागे होत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग एवढा सुस्त झाला आहे का ? असा संतप्त सवाल वाहनधारक आणि ग्रामस्थांनी केला आहे.

राशिवडेतील रिंगरोडचा प्रश्न कित्येक वर्षे भिजत पडलेला आहे. या रस्त्याच्या सुरुवातीलाच असणारी मोठी घसरण,त्यावरचे मोठे खड्डे आणि त्यावर म्हणजे खड्डे मुजवण्यासाठीची तत्परता दाखवत रस्त्यात उभे केलेले खडीचे डोंगर. यामधून सार्वजनिक खात्याचा चेहरा समोर येतो आहे. गेल्या वर्षी उसाच्या सीझनमध्ये याच ठिकाणी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर घरावर जाऊन आदळला होता. सुदैवाने त्यावेळी कोणतीही जिवीतहानी झाली नव्हती. मात्र, यामध्ये घराचे नुकसान झाले होते.  पुन्हा यावर्षी याच ठिकाणी दोन ट्रॉल्या उसाने भरलेला ट्रॅक्टर रस्त्याच्या चढ-उतारांमुळे आणि खड्ड्यांमुळे पलटी झाला. यावेळीही दैव बलवत्तर म्हणून जिवीतहानी झाली नाही.

परंतु, कुठलातरी मोठा अपघात होऊन जिवीतहानी झाल्यावरच या रस्त्याच्या कामाला शुभमुहूर्त लागणार काय ? असा सवाल ग्रामस्थांमधून होतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, या रस्त्याची नोंदच नसल्याची माहिती समोर आली आणि त्याची नोंदणी लगेच सुरू असून ती लवकरच पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे गोंडस उत्तर मिळाले. त्यासाठी स्थानिक प्रतिनिधी, आमदार, खासदारांनी लक्ष देऊन त्यांची पूर्तता करुन घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि वाहनधारकांनी केली आहे.