मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला आहे. हळूहळू सर्व व्यवहार पूवर्पदावर येत असताना शाळा, महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. याकडे पालक, विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले असताना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली.

सामंत म्हणाले की, येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालय सुरु करण्याचा विचार आहे. राज्यात दहावी आणि बारावीचे निकालानंतर आता प्रवेशाची लगबग सुरु झाली आहे. त्यातच राज्यातील कॉलेजेस कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राज्यात सगळीकडे हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनलॉकचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शैक्षणिक वर्ष लवकरच सुरु करणार आहे. येत्या  १ नोव्हेंबरपासून राज्यात महाविद्यालयं सुरु करण्याचा विचार आहे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले.