नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर पत्र समोर आले. त्या पत्रावर परमबीर सिंग यांची स्वाक्षरी नाही. हे संपूर्ण प्रकरण गंभीर आणि संवेदनशील बनत आहे. त्यामुळे याची एखाद्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी. राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होतोय, मात्र महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. याचा कोणताही परिणाम सरकारवर होणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत आज (रविवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. याबाबत गृहमंत्र्यांचे म्हणणं ऐकून घेतले जाईल. परमबीर सिंग मला भेटले तेव्हा त्यांनी फक्त त्यांच्या बदलीबद्दल म्हणणं मांडले  माझ्या खात्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे म्हटले होते. माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं आहे. देशमुख यांच्याबद्दलचा निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. यासंदर्भातील सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यांनी योग्य ती चौकशी करून निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.