पेमेंट सेवेसाठी ‘या’ बँकांबरोबर व्हॉटस्अॅपची भागीदारी…

0
65

मुंबई (प्रतिनिधी) : फेसबुकची उपकंपनी असलेले व्हॉटस्अॅप हे भारतातील सर्वांत लोकप्रिय अॅप आहे. नेहमी नवनवीन फिचर देणाऱ्या व्हॉटस्अॅपकडून आता युजर्सना पैसे पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) गुरुवारी सायंकाळी व्हॉटस्अॅपला ‘यूपीआय’ आधारित पेमेंट सेवेसाठी मंजुरी दिली. सध्या या सेवेसाठी व्हॉटस्अॅपने अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिओ पेमेंट बँकेसोबत भागीदारी केली आहे.

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे की, ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे. देशातील १४० हून अधिक बँकांचे ग्राहक आपले मित्र, नातेवाईक किंवा कोणत्याही शॉपिंगसाठी व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करू शकतील. व्हॉटस्अॅप पेमेंटसाठी केवळ यूपीआय बेस्ड् डेबिट कार्डची आवश्यकता असेल. व्हॉटस्अॅपच्या नव्या अपडेटमध्ये पेमेंट फिचर्स पाहायला मिळेल. दहा प्रादेशिक भाषांतील व्हॉटस्अॅप व्हर्जनमध्ये ही सेवा उपलब्ध असणार आहे. यासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

या सेवेमुळे मेसेजप्रमाणेच एका क्लिकवर पैसे पाठवणे शक्य होईल. सध्या देशात सुमारे ४० कोटींहून अधिक मोबाईलधारक हे अॅप वापरतात.