अहमदनगर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करत नाही. निवडणुकांच्या तोंडावर भावनिक मुद्दा पुढे केले जातात. आणि भाजपकडून समाजात तेढ निर्माण करणारे विषय पुढे आणले जातात, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज (शुक्रवार) येथे केली आहे. संगमनेरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

थोरात म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. शहरांची नावे बदलून काय होणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. दरम्यान, औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने उचलून धरली आहे. तर या नामांतरणास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. देशात अजून काही लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? असा खोचक सवाल करून पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.