कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्यांच कारण काय..?

0
45

कोल्हापूर (प्रतिनिधी) : २०१९-२० ही २ वर्षे कोल्हापूरसाठी अत्यंत अडचणीची ठरली आहेत. प्रलयकारी महापूर आणि कोरोना संसर्गाचे फार मोठे संकट सगळ्यांसाठीच त्रासदायक ठरले आहे. कोल्हापूरवर असणारी आई अंबाबाईची कृपा आणि राजर्षी शाहू महाराजांचा आशिर्वाद म्हणूनच या मोठ्या आपत्तीच्या काळात जनतेसाठी अठरा-अठरा तास काम करणारे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमन  मित्तल, महापालिका आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, शहर डी.वाय.एस.पी. प्रेरणा कट्टे असे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे साक्षात देवदूतच कोल्हापूरला मिळाले.

इतक्या मोठ्या आपत्तीच्या काळात जनता व लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने या अधिकाऱ्यांनी आपत्तकालीन परिस्थिती अतिशय शांततेने हाताळली. जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख आणि शहर उपअधिक्षक प्रेरणा कट्टे यांनी तर या दीड वर्षात कोल्हापूरातील सर्व काळे धंदे नेस्तनाबूत करुन काळे धंदेवाल्यांना मोका कायद्याचा हिसका दाखवून समाजाला घातक असणारे सर्व काळ्या धंद्यांचा बिमोड केला. इतकेच नव्हे तर खुद्द पोलीस खात्यात असणारे काही घरभेदी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करुन पोलीस खात्याची स्वच्छता केली. या सर्वांची दखल घेऊन राज्य पोलीस खात्याने प्रेरणा कट्टे यांच्या पथकास १ लाख रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कलशेट्टी यांनी महापूर काळ असो किंवा कोविडच्या काळात कधीही उसंत घेतली नाही. रजा नाही, सुट्टी नाही, अठरा-अठरा तास काम, मग ते आरोग्याचे असो किंवा नागरी विकास कामाचे असो. सामान्य नागरिक अशा आयुक्तांच्याकडे आपल्या कामासाठी केव्हाही प्रत्यक्ष किंवा फोनवर भेटू शकत होता. त्यांच्या वैयक्तिक संबंधामुळे मंत्रालयात कलशेट्टी आयुक्तांच्या शब्दाला एक चांगला अधिकारी म्हणून वजन आहे. त्यामुळे मंत्रालयातील, कोल्हापूरची बरीच प्रलंबित कामे मार्गी लागली. त्यांनी महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्तोत्र घरफाळा आणि नगररचना विभागातील भ्रष्टाचाऱ्यांची साखळी मोडून महापालिकेचे उत्पन्न वाढवून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. या तिन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, आता नंबर कोणाचा ? तर आता नंबर जिल्हाधिकाऱ्यांचाच असणार. कारण दौलत देसाई एक जबरदस्त व्यक्तिमत्त्व, २४ तास प्रशासनाच्या सेवेत राहणारा हा अधिकारी, शासकीय  वाहनाची वाट न पाहता मध्यरात्री सायकलवरुन घटनास्थळी पोहोचून काम करणारा आय. ए. एस. अधिकारी, जिल्हयाच्या डोंगरी दुर्गम भागात ६-६ किलो मीटर पायपीट करून वाड्या-वस्त्या वरच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन सुविधा देणारा अधिकारी, कित्येक वर्ष विनाकारण प्रलंबित असणारी जमीन-वतनांची प्रलंबित कामे निकालात काढून भ्रष्टाचाराची साखळी मोडीत काढून प्रत्यक्ष शासनाला महसूल मिळवून देऊन जिल्ह्याला सक्षम बनविणारा एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची मुदतपूर्व बदलीची अशी बातमी येईल आणि याच बरोबर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिशय युवा अधिकारी अमन मित्तल यांचीही मुदतपूर्व बदली झाली ही गोष्ट निश्चित ऐकायला मिळेल.

आपल्या कोल्हापूरच्या आणि राज्य मंत्री मंडळात वजन असणाऱ्या अनुभवी अशा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) व जिल्ह्यातील सर्वच लोक प्रतिनिधींनी अशा लोकाभिमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या करताना राज्य प्रशासनाने काही माहिती दिली होती की नाही, हे जनतेला सांगावे. जर तुम्हाला या बदल्यांची माहिती होती तर हे अधिकारी गप्प का राहिले. त्यामुळेच या अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करुन त्यांची मुदत आहे तोवर कोल्हापूरात कार्यरत ठेवावे, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती, कोल्हापूर यांनी काढलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

यावर अशोक पोवार, रमेश मोरे, बाबासाहेब देवकर, माणिक मंडलिक, पै.विष्णू जोशिलकर (महाराष्ट्र केसरी), अजित सासने, विनोद डुणूंग, संभाजीराव जगदाळे, कॉ.चंद्रकांत यादव, वसंत मुळीक, उदय भोसले, चंद्रकांत पाटील, संजय जाधव (काका), कादर मलबारी, भाऊ घोडके यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here