प्रदेशाध्यक्षपद काय कामाचे ? : ना. मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना टोला

0
145

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जर ग्रामपंचायतीत विजय मिळवता आला नाहीतर प्रदेशाध्यपद काय कामाचे, असा टोला ना.मुश्रीफ यांनी लावला. छोट्या निवडणुकीतील पराभवाचीच चर्चा खूप होते आणि ती त्रासदायक असते, असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी लावला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या खानापूर ग्रामपंचायतीत शिवसेनेची सरशी झाली. त्यावर प्रतिक्रिया देताना ना.मुश्रीफ बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आलेल्या देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे नेते माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (दि.२२) होणार असून त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ना.मुश्रीफ हे जिल्हा परिषदेमध्ये आले होते. यावेळी ते बोलत होते.

ना. मुश्रीफ म्हणाले की, खानापूर ग्रामपंचायतीच्या निकालाने भाजप प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांतदादांची चर्चा सुरु झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही याची चर्चा करत असतात. ज्याला स्वत:ची ग्रामपंचायत जिंकता आली नाही त्यांचा सल्ला कसा ऐकायचा. असा प्रश्‍नही कार्यकर्ते विचारत असतात, असा टोला ना.मुश्रीफ यांनी लावला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष नेते विजय भोजे, प्रसाद खोबरे, स्मिता शेंडुरे यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.