काय आहे Influenza विषाणू ? काय काळजी घ्याल ? जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली माहिती

0
24

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) इन्फ्लुएन्झा H3 N2 या विषाणूंनं डोकंवर काढलं असून इन्फ्लुएंझा (H3N2)ची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून येत आहेत. तथापी सकस आहार, पुरेशी झोप, गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर त्याचबरोबर आजाराची लक्षणे आढळून आल्यावर वेळीच उपचार घेतल्यास इन्फ्लुएन्झा आजारातून लवकर बरे होता येते. म्हणूनच इन्फ्लुएन्झा आजाराला ‘घाबरु नका..पण खबरदारी घ्या..!’, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे. ते माहिती अधिकारी वृषाली पाटील यांच्याशी साधलेल्या संवादारम्यान बोलत होते.

इन्फ्लुएन्झा आजार आणि त्याची लक्षणे याबाबत माहिती देताना डॉ. साळे म्हणाले, इन्फ्ल्यूएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फ्ल्यूएंझाचे टाईप A B आणि C असे प्रकार आहेत. इन्फ्ल्यूएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात. यावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सर्दी, ताप, खोकला होताच जवळच्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात त्वरित तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.

इन्फ्ल्यूएंझा होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी

यासाठी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी तसेच भरपूर पाणी प्यावे. खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हातरुमाल वापरावा. आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. ही काळजी घेवून देखील या आजाराची लक्षणे आढळून आलीच तर रुग्णांनी वेळीच उपचार सुरु करावेत, जेणेकरुन हा आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल.

इन्फ्ल्यूएंझा टाळण्याकरता काय आवश्यक आहे ?

हस्तांदोलन टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नये. लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. विशेषत: वृध्द व दुर्धर आजारी लोकांनी गर्दीत जाणे टाळावे.

अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय काळजी घेतात

इन्फल्यूएंझा ए एच1एन1 आजार खालील अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरुप धारण करु शकतो- पाच वर्षाखालील मुले ( विशेष करून 1 वर्षाखालील बालके ), 65 वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग, मधुमेह, स्थूलत्व, फुप्फुस, यकृत, मुत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झालेली व्यक्ती दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.