कोल्हापुरी ठसका (भाग दोन)

कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : पुणे, कराड आदी शहरांची हद्दवाढ झाली म्हणून कोल्हापूर शहराची हद्दवाढ करायलाच हवी का? असा काही नियम आहे का? हद्दवाढीनंतर कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होणार, याचा काही विचार करायला नको का?

संस्कृतीवर घाला

कोल्हापूर शहराची आणि ग्रामीण भागाची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. हा जिल्हा कृषी प्रधान आणि समृद्ध आहे. अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने आदी संस्थांचे जाळे आहे. दूध उत्पादनात जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. ऊस, अन्नधान्य, फळे, भाजीपाला उत्पादनात अग्रेसर आहे. हद्दवाढीनंतर या परंपरेला तडा जाणार हे नक्की. पिकाखालील जमिनी ठरवून अनुउत्पादक/ नापीक दाखवून त्यांची विक्री होण्याची भीती आहे. भूखंड माफियांचे राज्य निर्माण होण्याची भीती आहे. शिवाय शेतीच शिल्लक राहिली नाही, तर पशुधन नक्कीच कमी होणार. दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

शहराची हवा लागली की, कष्ट करण्याची सवय कमी होणार. त्याचबरोबर शेतात काम करायला लोकच मिळणार नाहीत. कृषी हे एकच क्षेत्र मोठया प्रमाणावर रोजगार देणारे क्षेत्र आहे आणि भविष्यात असणार आहे. केवळ भ्रामक विकास झाला की विकास म्हणता येईल का? शेतीचे नुकसान झाल्यास खाणार काय? महागाई वाढीला चालनाच मिळणार आहे. ग्रामीण संस्कृती, परंपरा धोक्यात येणार त्याचे काय? वाढत्या शहरी आकर्षणामुळे हादगा, गौराईचे पारंपरिक खेळ, गाणी, लग्नातील रुखवताची गाणी अशा अनेक परंपरा काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. त्यांना आणखी नख लागण्याची अधिक शक्यता आहे.

मुळशी पॅटर्न करायचा आहे का ?

पुणे शहराची हद्दवाढ झाली. फावले कुणाचे हे लक्षात घेणार की नाही? जमीन खरेदी-विक्रीत भूखंड माफियांच्या टोळ्या घुसल्या. मुळशी पॅटर्न तयार झाला. वर्चस्वासाठी एकमेकांचे मुडदे पडले. पुण्यात हद्दवाढ झाली आणि भले मोठे रस्ते झाले उड्डाण पूल उभारले. तरीही वाहतुकीची कोंडी कायम आहे. निवृत्तांसाठी शांत आणि सुरक्षित शहर म्हणून पुणे ओळखले जायचे. विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराची गुन्हेगारीचे शहर म्हणून नवी ओळख रूढ होऊ लागली आहे. टोळ्यातील गुन्हेगारांचा, दहशतवाद्याचा लपण्याचा अड्डा बनला आहे. कोरेगाव पार्कसारख्या शांत आणि प्रतिष्ठित भागातील जर्मन बेकरीत बॉम्ब स्फोट झाला. अनैतिक व्यवसाय फोफावले आहेत.

लँड माफियांचे पेव फुटणार

हद्दवाढ झाली तर लँड माफियांच्या टोळ्यांचे पेव फुटणार. खोटी कागदपत्रे, वटमुख्त्यार पत्र तयार करून वयोवृद्धांच्या  जागांवर, स्थावर मिळकतीवर डल्ला मारला जाणार नाही याची खात्री कोण देणार? हद्दवाढीबरोबर वाढत्या गुन्हेगारीचा चढता आलेख लक्षात घ्यायला हवा. या गोष्टींचा विचार करून कोल्हापूरच्या हद्दवाढीचा विचार करायला हवा.

-ठसकेबाज

(क्रमशः)