सोलापूर (प्रतिनिधी) : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटील’ या आपल्या अनोख्या भाषाशैलीमुळे संपूर्ण राज्यात परिचित झालेले सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी पाटील यांनी पुन्हा एकदा त्याच भाषेत शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा समाचार घेतला. जाधवांच्या विधानसभेतील भाषणाचा दाखला देत ‘काय तो आवेश..काय ती जळजळ.. काय ती रडारड…काय ते वाकडं उभा राहणे… ओके आहे सगळं…’ म्हणत शहाजीबापूंनी भास्कर जाधव यांच्यावर हल्लोबाल केला.

शिवसेनेचे गुहागरचे आमदार जाधव यांनी विश्वासदर्शक ठरावानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनाच्या भाषणावेळी बंडखोर आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. ज्यांना ईडीच्या नोटिसा आल्या, त्यांच्याच घरापुढे आता केंद्र सरकारची सुरक्षा आहे. ईडीच्या नोटिसीमुळेच यातील बहुतांश आमदार शिंदे गटात गेले आहेत, अशी घाणाघाती टीका जाधव यांनी केली होती.

भास्कर जाधव यांच्या विधानसभेतील भाषणाला सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भास्कर जाधव विधानसभेचा संजय राऊत झाला होता. काय ते आवेशात भाषण… काय ती जळजळ, काय ती रडारड… काय ते वाकडे उभे राहणे… ओके आहे सगळं.. असे म्हणून त्यांनी जाधवांवर निशाणा साधला होता.