कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचा पश्चिम दरवाजा दर्शनासाठी नवीन वर्षात खुला करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या बैठकीत  घेण्यात आला. त्यामुळे १ जानेवारीपासून मंदिराच्या पश्चिम दरवाजातून आत येवून भक्तांना गरुड, गणपती मंडपामधून मुख दर्शन घेता येणार असल्याचे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

याआधी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन  मंदिरातील दर्शन वेळेत वाढ करण्यात आली आहे. सकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मंदिर खुले ठेवण्यात येत असल्याने भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण मिळवणे सोपे झाले आहे. त्याचबरोबर १ जानेवारीपासून मंदिरातील सर्व प्रकारची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. अंबाबाई,  दख्खनचा राजा जोतिबासह देवस्थान समितीच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व मंदिरातील दर्शन वेळेत पुन्हा  वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार भाविकांना  पहाटे ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत दर्शन घेता येणार आहे. तरी  भक्तांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.