मुंबई (प्रतिनिधी) : सचिन वाझे प्रकरण आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेला गंभीर आरोप यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारची कोंडी केली आहे. या प्रकरणात ठाकरे सरकार अडचणीत आले असतानाच राष्ट्रवादीने विरोधकांच्या आरोपांना आक्रमक उत्तर देण्याची रणनिती आखल्याचे दिसून येते. आता विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी गंभीर आरोप केले आहेत.

अनिल गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सत्ता गेल्यापासून फडणवीसांचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे. तसेच फडणवीस सरकारमधील मंत्री हे तेव्हा काय चिंचोके गोळा खात होते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मी स्वतः कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आयुक्तांच्या मदतीने पैसे गोळा केले आणि कोणत्या नंबरच्या गाडीतून पैसे कुठे आले, व ते कोणाकडे उतरवले. याची सविस्तर माहिती देवेंद्र फडणवीस यांना दिली होती, पण मंत्र्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांनी मंत्रांना क्लीनचीट दिली, असा आरोप गोटेंनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस अत्यंत अहंकारी, लबाड आणि दगलबाज आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वाटलेल्या नोटा वर्षा बंगल्यावर छापल्या होत्या का? फडणवीसांच्या दरबारातील नवरत्नांच्या यादीवरून नुसती नजर फिरवली तरी सर्व लक्षात येईल, असे अनिल गोटे यांनी म्हटले आहे.