पुणे (प्रतिनिधी) : २०२० हे वर्ष सर्वांसाठी धक्कादायक ठरलं आहे. आधी कोरोनाने सर्व त्रस्त असताना अनेकांनी आपले जिवलग गमावले. चित्रपटसृष्टीने तर अनेक दिग्गज अनंतात विलीन झाले. यातच आता अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे ४७व्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. आज (गुरुवार) पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नरेंद्र भिडे यांच्या निधनामुळे मराठी कलाविश्वावर एकच शोककळा पसरली आहे. सकाळी ९.३० वाजता पुण्यातील डॉन स्टुडिओमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनसाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुले आहेत. मुळशी पॅटर्न, रानभूल, त्या रात्री पाऊस होता, हिप हिप हुरे, पाऊलवाट , अनुमती , दिल ए नादान (बायोस्कोप) , देऊळ बंद, कलम ३०२, साने गुरुजी, शासन सिंहासन, चौदहवी का चाँद, आंधळी कोशिंबीर, आघात, शेवरी, रमा माधव, एलिझाबेथ एकादशी, यशवंतराव चव्हाण, हरिशचंद्राची फॅक्टरी अशा अनेक मराठी चित्रपटातील गाणी त्यांनी संगीतबद्ध केली होती.