कळे येथे पेन्शन संघर्ष यात्रेचे जल्लोषी स्वागत…

0
110

कळे (प्रतिनिधी) :  २००५ नंतरच्या राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय, सेवेतील कर्मचाऱ्यांना लागू असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. या जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून मुंबई येथील आझाद मैदानातून पेन्शन संघर्ष यात्रा निघाली आहे. ही यात्रा पन्हाळा तालुक्यातील कळे येथे पोहचली. यावेळी यात्रेचे जल्लोषी स्वागत करून पेन्शन परिषद आयोजित करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर होते. 

यावेळी परिषदेची सुरुवात पेन्शन प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. यावेळी १ नोव्हेंबर २००५ नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना १९८२ ची बंद झालेली जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी, फॅमिली पेन्शन, ग्रॅच्युईटी लागू करण्याच्या मागणीसाठी मंत्रालयावर संघर्ष मार्च काढण्याचा निर्धार करण्यात आला. पेन्शन परिषदेमध्ये महाराष्ट्रातील विविध केडरच्या संघटनांनी एकत्रितपणे पेन्शन लढ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणे, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विभागातील एखादा पेन्शनर मयत झाल्यास त्याच्या कुटुंबासाठी प्रत्येकी किमान शंभर रुपये मदत निधी उभारणे आदी ठराव करण्यात आले.

यावेळी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, पन्हाळा तालुकाध्यक्ष अमर वरुटे, प्रमोद पाटील, संजय भोसले, दिलीप वाळवेकर, मारुती फाळके आदी उपस्थित होते.