कोल्हापूर (प्रतिनिधी) : पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल, असे वक्तव्य ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचे स्वागतच आहे. पण, मातोश्रीच्या आदेशानुसार शिवसेना आगामी निवडणुकीत वाटचाल करेल, असे वक्तव्य राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.  

पत्रकात पुढे म्हंटले आहे की, महाविकास आघाडीची स्थापना होवून दोन वर्षांचा कालावधी होत आहे. महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. ते कार्यकाल पूर्ण करेल, यात काडीमात्र शंका नाही. आगामी काळात होणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेसह अनेक निवडणुकांच्या बाबतीत शिवसैनिक मातोश्रीच्या आदेशास बांधील असतील. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या-त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेवूनच पक्ष आदेश देतील त्याप्रमाणे पुढील निवडणुकीत शिवसेनेची वाटचाल असणार आहे.

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या बाबतीत पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांच्याकडून कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८१ ऐवजी ९१ प्रभाग होण्याची शक्यताही राजेश क्षीरसागर यांनी वर्तविली. मागच्या दोन्ही महानगरपालिका निवडणुकींचा आढावा घेतला तर दोन्ही निवडणुकीत शिवसेनेचे २० ते २५ उमेदवार दोन नंबरला असल्याचे पहावयास मिळते. प्रत्येक प्रभागात शिवसेनेची ताकत आहे. त्यामुळे बदलेल्या त्रिसद्स्सीय प्रभाग रचना शिवसेनेच्या पथ्यावर आहे. गेल्या काही निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात होणाऱ्या आर्थिक घडामोडींमुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव होत होता. पण, या प्रभाग रचनेमुळे शिवसेनेच्याच उमेदवारांचे पारडे जड राहणार आहे.

त्यामुळे आसपासच्या प्रभागातील इच्छुकांनी एकसंघ होवून कामाला लागावे. पदाधिकाऱ्यांनी मतदार नोंदणीसह इतर माध्यमातून जास्तीत जास्त मतदारापर्यंत पोहचवावे. सर्वांनी आपली जबाबदारी ओळखून कामाला लागा. शिवसेनेचा पहिला महापौर करण्यास सज्ज व्हा, अशा सूचनाही राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना पत्रकाद्वारे केल्या आहेत.