कागल (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि भाजपचे नेते तब्बल सात महिन्यानंतर घराच्या बिळातून बाहेर पडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक स्वागत, असा जोरदार उपरोधिक टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला आहे.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादा पाटील आणि भाजापाचे नेते सात महिन्यानंतर घराच्या बिळातून बाहेर पडले. ते कोविड सेंटरच्या आत न जाता बाहेर त्या कोरोनायोध्द्याना निदान फुलं तरी द्यायला लागले आहेत, याबद्दल त्यांचे आभार मानतो. दरम्यान, त्यांनी आत जाऊन बघितलं असतं तर किती चांगली व्यवस्था निर्माण केली आहे, हे त्यांना कळाले असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच कोल्हापूर जिल्ह्यात १७ हजार रुग्णांना रेमडीशिवर हे औषध मोफत दिले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने दोन हजार  इंजेक्शन्स मोफत दिली. अलीकडचे चार महिने तर परिस्थिती फारच गंभीर होती. कारण दररोज शंभर- दीडशे फोन यायचे. कुणी बेड मिळवून द्या म्हणायचं, तर कुणी ऑक्सिजन -व्हेंटिलेटरचा बेड पाहिजे म्हणायचं, तर कुणी रेमडीसिवर इंजेक्शन मागायचं. या सगळ्या परिस्थितीत आपला-परका, गटाचा – तटाचा विचार न करता इमानेइतबारे रुग्णसेवा केली. यापुढेही गट-तट, राजकीय अभिनिवेश असले मतभेद न मानता, जोपर्यंत कोरोना असेल तोपर्यंत रुग्णांसाठी अहोरात्र कार्यरत राहणार असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी विनायक गणपतराव गाताडे यांच्यावर पुण्यातील मंगेशकर इस्पितळात उपचार केल्याबद्दल गाताडे परिवाराने ना. मुश्रीफ यांचा कृतज्ञतापर सत्कार केला. विनायक गाताडे यांच्यासह केडीसीसी बँकेचे संचालक विलासराव गाताडे, कागलचे माजी नगराध्यक्ष सुरेश गाताडे परिवारातील सदस्यांनी मुश्रीफ यांचा सत्कार केला.