कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यभरात मिनी विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लागू केले आहेत. आज (शनिवार) विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात लॉकडाऊनला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पोलिसांनी शहरातील प्रमुख चौकात कडक बंदोबस्त ठेवला असून प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त रस्त्यावर येण्यास नागरिकांनी येणे टाळले आहे. रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळता तुरळक वाहतूक सुरू आहे. सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. कोल्हापुरातील दसरा चौकात पोलिसांनी नाकाबंदी करून तपासणी सुरू केली आहे.

नेहमी वाहनांची मोठी वर्दळ असणाऱ्या कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरू होती. पेट्रोल पंप सुरू असले तरी, ग्राहकांची वर्दळ नगण्य दिसून आली. दुकाने, फेरीवाले, फळविक्रेते यासह सर्वच व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत. औषध दुकाने आणि वैद्यकीय सेवा वगळता इतर कोणतेही व्यवसाय सुरू नाहीत. रस्त्यावर वाहनांची वर्दळ अतिशय कमी आहे.