मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंधासह विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. परंतु या निर्बंधांना व्यापारी वर्गातून मोठ्या प्रमाणात विरोध होता दिसू लागला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राजकीय नेत्यांना आणि जनतेला विशेष आवाहन केले आहे.

राज्यात पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची परिस्थिती जास्त गंभीर बनली आहे. विविध शहरांत सक्रिय रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. या परिस्थितीतून आपल्याला यशस्वीपणे बाहेर पडायचं असेल तर सामूहिक प्रयत्न करावे लागतील. यासाठी माझी समाजातील सर्वच घटकांना, मग तो व्यापारी असेल, नोकरदार असेल किंवा विविध राजकीय पक्षांचे नेते या सर्वांना विनंती आहे की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारचे जे प्रयत्न आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.