साळवण (प्रतिनिधी) : सध्याच्या काळात समाजमाध्यमातून संपर्क होत असल्याने आपल्यापासून लांब असलेल्या आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला पत्र लिहून खुशाली कळवण्याची परंपरा लोप पावत चालली आहे. ही परंपरा जिवंत ठेवण्यासाठी गगनबावडा येथील जि.प. च्या परशुराम विद्यालय-ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही पत्र लिहतो’ हा उपक्रम सुरू केला आहे.

यावेळी जवळपास ७० विद्यार्थ्यांनी आपल्या प्रियजनांना पत्रे लिहिली. परशुराम विद्यालयात शिकणार्‍या अनेक विद्यार्थी कस्तुरबा निवासी विद्यालयात वास्तव्यास आहेत. अनेक विद्यार्थी राज्याच्या इतर जिल्ह्यातील, तर काही विद्यार्थी कर्नाटक राज्यातील आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या पत्रातून आपल्या नातेवाइकांना भावना व्यक्त केल्या. मोबाईल फोनवर जे आपण बोलू शकत नाही ते पत्राद्वारे व्यक्त करू शकतो, असा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना आला. दर महिन्याला एक पत्र लिहून पाठवायचे, असे या उपक्रमाचे स्वरुप असणार आहे.

कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विषायाचे प्रा. कुंडलिक जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमासाठी प्राचार्य गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. दीपक पाटील, स्वाती चौगले, सुप्रिया माळी, जमादार यांचेही सहकार्य लाभले.