शिरोळ (प्रतिनिधी) : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी, कुरुंदवाडमधील भालचंद्र सिनेमागृहासाठी निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. ते कुरुंदवाडमध्ये शिवसेना चैतन्य मेळाव्यात आज (शनिवार) बोलत होते. यावेळी ८३ शिवसेनेच्या उमेदवार आणि ८ सरपंचांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. हा मेळावा कुरुंदवाड येथील भालचंद्र थिएटरमध्ये संपन्न झाला.

शिवेसना शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे यांनी, मंत्री सामंत यांना भालचंद्र थिएटर आणि कुस्ती मैदानासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. तसेच मुस्लिमसेनेचे अमीर इनामदार यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला.

यावेळी मंत्री उदय सामंत यांनी, भालचंद्र सिनेमागृहासाठी सहा महिन्याच्या आत निधी उपलब्ध करून देऊ. तसेच कुस्ती मैदानासाठी दोन कोटींचा निधी देणार आहे. जयसिंगपूरमधील छ. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाईल. असे आश्वासन दिले. तर नगरपालिका, पंचयात समिती आणि जिल्हापरिषदेमध्ये जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून जाण्यासाठी प्रयत्न करूया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्री कसा असला पाहिजे हे दाखवून देत दिलेली सर्व वचनांचे त्यांनी पालन केल्याचे सांगितले.

खा. धैर्यशील माने, शिवसेना उप जिल्हाप्रमुख मधुकर पाटील, महिला आघाडी संघटिका मंगलाताई चव्हाण, जिल्हाप्रमुख  मुरलीधर जाधव, माजी आ.  उल्हास पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  याप्रसंगी पं. स. सभापती कविता चौगुले, उपसभापती संजय माने, जि. प. च्या समाज व बालकल्याण सभापती स्वाती सासणे, युवासेना जिल्हाप्रमुख शिवाजी पाटील, तालुका प्रमुख रेखा जाधव आजी मान्यवर उपस्थित होते.