आम्ही आमच्या घराला मोदींचे नाव देऊ, तुमच्या पोटात का दुखतंय..!

0
75

मुंबई  (प्रतिनिधी) : जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव दिले आहे. यावर टीका करताना  स्टेडियमला मोदी  यांचे नाव दिल्यामुळे मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत, असे शिवसेना नेते  संजय राऊत यांनी म्हटले आहे. या टीकेला भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

निलेश राणे यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पहिल्या क्रमांकाचे नेते आहेत, ते मोठेच नेते आहेत. संजय राऊत खालच्या कुठल्या क्रमांकाचे नेते आहेत, हे मला माहित नाही. संजय राऊत यांनी स्टेडियमच्या नावावरुन टीका केली. पण, आक्षेप नक्की कोणाचा आहे?  स्टेडियमला मोदींचं नाव न देण्यासाठी कोणाचा आक्षेप आहे का?, असा सवाल करत  सुब्रोतो रॉय यांच्या पुण्याच्या स्टेडियमच्या उद्घाटनाला शरद पवार गेले होते, त्यावेळी या स्टेडियमला सुब्रतो रॉय यांचे नाव होते. मग, सुब्रोतो रॉय शरद पवारांपेक्षा मोठे झाले का?, असे म्हणत राणे यांनी राउत  यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी पांचट विषय बंद करावेत, देशासमोर खूप मोठे प्रश्न आहेत. जर, आक्षेपच नसेल तर पोटात का दुखतंय. आम्ही आमच्या घराला मोदींचे नाव देऊ नाही, तर स्टेडियमला देऊ. मूळात, संजय राठोड हे प्रकरण शिवसेनेसाठी अडचणीचे ठरत असल्यामुळे  असले विषय काढून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न  करत आहेत.