नवी मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे,  तेही सोडवतील, असा मला विश्वास आहे. नाही सोडवले, तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी  आज (शनिवार) येथे केले. अण्णासाहेब पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त  आयोजित माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  

ते पुढे म्हणाले की, माथाडी कामगार चळवळीसाठी आमच्या सरकारने सर्व दरवाजे पूर्णपणे उघडे केले होते.  माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की, ते सोडविण्यासाठी  आम्ही तशी व्यवस्था उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते. पण लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असते. कधी हे असतात, कधी ते असतात. पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत, असे ते म्हणाले.

दरम्यान, राज्यात महाविकास  आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजपने सतत पुन्हा सरकारमध्ये येण्याचे मुहूर्त सांगितले . त्यासाठी भाजप राज्यात ऑपरेशन कमळ राबविणार असल्याच्या बातम्याही येऊ लागल्या. यावर बऱ्याच चर्चाही झडू लागल्या. परंतु अद्याप सरकार पाडण्यात भाजपला यश आलेले नाही. आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी सूचक विधान केले आहे.  त्यामुळे सत्ता बदलाच्या चर्चांना सुरूवात होण्याची शक्यता आहे.