पिंपळगाव (प्रतिनिधी) : आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या २५ ते ३० वर्षात गोरगरिबांच्या कल्याणाचे समाजकारण केले. राजकीय विद्वेषातून समरजीत घाटगे मात्र त्यांच्यावर भांडवलदार असल्याची टीका करीत आहेत. लोकशाहीला न मानणाऱ्या समरजीतसिंह घाटगे यांची राजेशाही मोडून काढूया, असे आव्हान केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने यांनी दिले. ते कागल तालुक्यातील पिंपळगाव येथे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. संजयबाबा घाटगे होते.        

यावेळी पिंपळगाव तीन कोटींचे विकासकामांचे उद्घाटन आणि कामगारांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले. तसेच गावातील गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचे सत्कार करण्यात आले.

आ. मुश्रीफ म्हणाले, माजी आमदार संजयबाबा आणि मी एकमेकांचे विरोधक होतो. आम्ही वैयक्तिक शत्रू कधीही नव्हतो.  महाविद्यालयापासूनच एकमेकांचे मित्र असलेले आम्ही व्यक्तिगत द्वेष, दुश्मनी आणि कटूता न ठेवता खिलाडूवृत्तीने राजकारण आणि समाजकारण करीत राहिलो.

माजी आ. घाटगे म्हणाले, आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा लौकिक महाराष्ट्रासह सर्व देशभर वाढविला. बँकेचे अध्यक्ष म्हणून बँकेच्या गाडीसह भत्ता व कोणत्याही सोयी-सुविधेचा लाभ त्यांनी घेतला नाही. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी हिंम्मत असेल तर आधी ही पथ्ये पाळावीत आणि मग टीका करावी.

यावेळी जि.प. सदस्य युवराज पाटील, जि.प. सदस्य मनोज फराकटे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, पोलीस पाटील बापूसाहेब पाटील, शामराव पवार, उपसरपंच युवराज डाफळे, दत्ता पाटील, राजू पाटील, मिलिंद माने, सतपाल माने आदी उपस्थित होते.