मुंबई (प्रतिनिधी) : रिपब्लिकन टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अर्णबच्या सुटकेपर्यंत आम्ही काळ्या पट्ट्या बांधू, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम ठाकरे सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, एका मोठ्या टीव्ही चॅनलच्या संपादकाला तुम्ही फरपटत नेता, तो विनंती करतो, माझ्या आईला औषधे देऊ द्या, मग निघूया. पण ते एकले जात नाही. या गोष्टीचे आम्ही समर्थन करणार नाही.

अर्णव यांनी विरोधात बोलल्यामुळे राज्य सरकार कुठलीतरी संधी शोधत होते. त्यातूनच ही कारवाई झाली. या प्रकरणासाठी आंदोलन, निषेध व्यक्त करणार आहे. पत्रकार, महिला किंवा ज्यांनी आत्महत्या केली त्यांचे कुटुंबीय असू द्या, त्यांच्या  अन्यायाविरोधात सगळ्यांनी उतरलं पाहिजे. यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता नाही. नाईक कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. पण अर्णव गोस्वामी यांना आज ज्याप्रकारे अटक झाली आहे ते निषेधार्ह आहे.