आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार होतो, पण…. : उद्धव ठाकरे

0
28

बुलडाणा (वृत्तसंस्था) : आपल्या सरकार काळात आपण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करणार होतो. पण शिंदे गटात गेलेल्यांमुळे ते शक्य होऊ शकले नाही. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मी मुख्यमंत्री असतो, तर एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ दिली नसती, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज बुलढाण्यातील चिखली येथे शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. 

गद्दारांना शिवसेना फोडली असे वाटत आहे, पण शिवसेना म्हणजे मेलेले गाढव नाही. ही जिवंत रसरसती माणसे आहेत. शिवसेना तुम्ही कितीही फोडा. फोडून फोडून दमाल तुम्ही; पण माझी शिवसेना तुम्हालाच फोडून टाकून दिल्याशिवाय राहणार नाही’, असेही ठाकरे म्हणाले.

‘शिवसेनेवर घाव घातल्यानंतर मी तुमच्या भरवश्यावर उभा आहे. माझे दु:ख सांगायला आलो नाही, तर तुमच्या संकटात तुमच्यासोबत आहे, हे सांगण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करू नका’, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना केले.

शिवरायांनी लढायला शिकवले आहे. लंडनमधून तलवार आणणार असे हे म्हणाले. तलवार आणून चालणार नाही. त्यासाठी मनगटत हवं. ते पोलादी मनगट माझ्या मर्द मावळ्यात आहेत. एका बाजूने शिवरायांचे नाव घेतात दुसऱ्या बाजूला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी महाराजांचा अवमान करतात. महाराजांचा अपमान कराल तर आम्ही एक तर विराट मोर्चा काढू किंवा आम्ही महाराष्ट्र बंद केल्याशिवाय राहणार नाही.

तोतये बनावट गद्दार आहेत. त्यांचे कर्तृत्व शून्य आहे. ते तुम्हाला फसवत आहे. भाजपवाले तुम्हाला सांगतील. तुमच्यातला मुख्यमंत्री केला. हा मुख्यमंत्री तुम्हाला मान्य आहे का? दिवाळीत एक यू-ट्यूबवर व्हिडीओ पाहिला. दिवाळीत मुख्यमंत्री रमले शेतीत. पूर्वी भिंतीवर लिहिलेलं असायचे नारूचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा. आता तसे म्हणायचे का?, असा सवालही ठाकरे यांनी विचारला. देशात दुसरा हेलिकॉप्टरने शेतीत जाणारा मुख्यमंत्री दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा, असेही आवाहन त्यांनी केले.