मुंबई (प्रतिनिधी) :  काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांच्या खात्याच्या निर्णयात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला आहे.  काँग्रेसचा  औरंगाबादच्या नामांतरणाला विरोध असताना  मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असे केल्याने  महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे.  

बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते आहे. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने  शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो. याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया, असे आवाहन थोरात यांनी केले आहे.