मुंबई (प्रतिनिधी) : आम्ही शिवसेनेतच आहोत, त्यामुळे निवडणुका हरण्याचा प्रश्न येत नाही. ४० आमदार फुटतात ही आजची आग नाही. आम्हाला आमचे घर सोडून येण्याची इच्छा नाही. बाळासाहेबांना आणि त्यांच्या मुलाला दु:ख देण्याची आमची इच्छा नाही. सर्व आमदार साहेबांना त्रास सांगण्यात जात होते; पण चहापेक्षा किटली गरम. आमचे फोनही घेतले जात नव्हते, अशी खंत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर ते बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, १९९० वेळी भाजपसोबत पहिल्यांदा शिवसेनेने युती केली. मी १७ वर्षांचा असताना शिवसेनेत काम सुरु केले. आम्हाला पुढे निवडणूक लढायला लागेल असे वाटलेही नव्हते. जे मिळाले ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने मिळाले. आज आम्हाला बंडखोर म्हटले जाते आहे. आम्ही बंड केलेले नाही तर उठाव केला आहे. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. मला पुन्हा टपरीवर पाठवण्याची भाषा करण्यात आली. टपरीवाला म्हणून मला हिणवले; पण लक्षात ठेवा धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे.

आम्ही काय सहजपणे आमदार झालेलो नाहीत. भगवा हातात घेऊन इथपर्यंत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आम्हाला मंत्री केले हे उपकार आहेत. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचे पाणी, प्रेते अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो, असेही ते म्हणाले.