कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर शहरात पूराचा जोर ओसरल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. शहरात गेले पंधरा दिवस नागरीकांना पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या टँकरद्वारे नागरीकांना पाणी पुरवठा केला जात होता. परंतु, उद्या (बुधवार) पासून शहरात शंभर टक्के पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे जल अभियंता अजय साळुंखे यांनी सांगितले.

शहराला पाणी पुरवठा करणारे तीनही उपसा केंद्र महापूराच्या पाण्यात बुडाल्याने शुक्रवार (दि. २३) जुलैपासून शहराचा पाणी पुरवठा बंद झाला होता. पुराचे पाणी ओसरु लागल्याने बालिंगा उपसा केंद्रात दोन ते तीन फुट पाणी असतानाही महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी तातडीने  पंपिंग स्टेशनमधील मोटारी बाहेर काढून हिटिंगसाठी पाठविल्या. चार दिवसातच बालिंगा पंपिग स्टेशन येथून पाणी पुरवठा सुरु करण्यात आला. यानंतर नागदेवाडी येथील पंपिंग सुरु करण्यात आले. तर काल (सोमवार) पासून ई वॉर्डसाठी पाणी पुरवठा शिंगणापूर येथून सुरु करण्यात आला आहे.

आज (मंगळवार) सकाळी पुईखडीला पुरवठा करण्यात येणाऱ्या चार पंपापैकी एक पंप सुरु करण्यात आला आहे. तर दुपारी दोन वाजता दुसरा पंप सुरु करण्यात आला. सायंकाळी सहा वाजत तीसरा पंप सुरु करुन पुईखडी येथे पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे उद्यापासून संपुर्ण शहराला शंभर टक्के पाणी पुरवठा सुरु होणार असल्याचे जल अभियंता अजय साळुंखे यांनी सांगितले.