सावरवाडी (प्रतिनिधी) : नदी पात्रातील पाणी अडविण्याकडे पाटबंधारे खात्याचे होणारे दुर्लक्ष, त्यामुळे शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचा दरवर्षी नोव्हेंबर महिन्यांत होणारा सावळागोंधळ, याची प्रचिती यावर्षीही येत आहे. यंदा भोगावती, तुळशी, नद्यांची पाणी पातळी नोव्हेंबर महिन्यात घटल्याने ऐन हिवाळ्याच्या प्रारंभीच नदीकाठच्या ३६ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. 

पाटबंधारे खात्याकडून पाणी आडवा धोरणाकडे दुर्लक्ष झाल्याने शेती पिकांना पाणी मिळत नाही. ऐन हिवाळ्यात बंधाऱ्यांना बरगे घालण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसाने गेली तीन आठवडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी कमी झाली. भोगावती, तुळशी नद्यांच्या पात्रातून वाया जाणाऱ्या पाण्याचे अद्याप नियोजन झालेले नाही. बंधाऱ्यांना बरगे घालणे गरजेचे आहे.

तुळशी भोगावती नद्यांच्या पात्रातून ३६ गावांच्या सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. परंतू नद्यांच्या पात्रात पाणी कमी झाल्याने नळ पाणीपुरवठा योजनेना पाणी पुरत नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करता येत नाही. शेतीचाही पाणीपुरवठा बंद पडू लागला आहे. परिणामी आडसाली ऊस लागणी क्षेत्र वाळू लागले आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्याने बंधाऱ्यांना त्वरीत बरगे  घालण्याची मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.