अमन मित्तल यांच्या १.४८ कोटींच्या ‘कॉम्प्युटर खरेदी’ची चौकशी करा… (व्हिडिओ)

जलव्यवस्थापन समितीच्या मागणीमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ

0
734

कोल्हापूर (प्रतिनिधी): राष्ट्रीय जलव्यवस्थापन समितीमधील सादिलवार रकमेतून माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मितल यांनी केलेल्या कॉम्प्युटर आणि प्रिंटर साहित्याची सुमारे १ कोटी ४८ लाखांच्या खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी जलव्यवस्थापन समितीने अचानक केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

जलव्यवस्थापन समितीमधील सादिलवार रक्कमेतून खर्चासाठी ४ टक्के रक्कम बाहेर काढली जाते. ही रक्कम फक्त त्याच विभागाच्या खरेदीसाठी अथवा इतर कामासाठी वापरली जाते. पण याच रकमेमधून माजी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी कार्यकाल संपायच्या काही दिवस अगोदर एक कोटी ४८ लाखांचे १६७ कॉम्प्युटर आणि १६७ प्रिंटर खरेदी केली आहेत. सदरची खरेदी करताना जलव्यवस्थापन समितीला विश्वासात न घेता केलेली असल्याचे आजच्या (गुरुवार) जलव्यवस्थापन समितीच्या सभेतून समजले. कोणतीही मागणी नाही, टिप्पणी नाही असे असताना देखील इतकी मोठी खरेदी केल्याचे आजच्या सभेमध्ये समजताच एकच गोंधळ उडाला. यामुळे संतप्त सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे चौकशीची मागणी केली. चव्हाण यांनी ही मागणी मान्य केल्याचे समजते.

जलव्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. हेमंत कोलेकर यांनी याप्रकरणी मित्तल यांनी घाईघाईने हा व्यवहार केला असून त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. पहा खालील व्हिडिओ…

 

विशेष म्हणजे गगनबावडा तालुक्यात फक्त दोन कर्मचारी असताना पाच कॉम्प्युटर आणि पाच प्रिंटर दिल्याचे समजते. करवीर तालुक्यातही काहीही गरज नसताना काँम्पुटर आणि प्रिंटर दिल्यामुळे धूळखात पडले आहेत. सदरच्या खरेदी व्यवहाराची माहिती कोणालाच माहिती नव्हती. पण आज झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत ही माहिती कळताच सर्व जण अवाक् झाले.

या बैठकीला अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, शिक्षण सभापती प्रवीण यादव, बांधकाम सभापती हंबीरराव पाटील, हेमंत कोलेकर, शिवाजी मोरे, स्वरूपा जाधव आणि उदय पोवार उपस्थित होते.