इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या आणि गळतीमुळे सातत्याने चर्चेत असलेल्या कृष्णा पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला इचलकरंजी-टाकवडे मार्गावर व्हॉल्वलाच गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. हा व्हॉल्व तुटल्याने रस्त्यावरती सुमारे २० फुटांचा कारंजा उडत होता. यामुळे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली.

सध्या उन्हाळा सुरु असून त्यातच टाकवडे वेस परिसरात वर्दळीच्या रस्त्यावरच व्हॉल्वला गळती लागण्याचा प्रकार घडला. रस्त्यावरती उंचच्या उंच कारंजा निर्माण झाला होता. या गळतीची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने कृष्णा नदीतून मजरेवाडी येथून सुरु असलेला पाणी उपसा तातडीने बंद करत दुरुस्तीचे काम हाती घेतले. सध्या शहराला तीन ते चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यातच या गळतीमुळे पाणी पुरवठ्याचे नियोजन पुन्हा विस्कळीत होणार आहे.