कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधीनगर (ता.करवीर)  येथील डपिंग ग्राऊंडवरील जमा झालेल्या सुमारे ६  हजार  टन कचऱ्याचे बायो मायनिंगव्दारे व्यवस्थापन केले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ आ. ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत  आज (गुरूवार) करण्यात आला.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

उद्योजकांची सामाजिक जबाबदारी (सीएसआर फंड) अंतर्गत रिकार्ट इंडिया  दिल्ली  आणि हिंद ॲग्रो अँड केमिकल्स कोल्हापूर या कंपनीच्या माध्यमातून कचरा बायो-मायनिंगचे काम केले जाणार आहे. यात ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जाणार आहे. सुका कचरा सिमेंट फॅक्टरीला दिला जाणार आहे. तर ओला कचरा  स्थानिक शेतकऱ्यांना खत निर्मितीसाठी अथवा जमीन भरावाच्या कामासाठी वापरला जाणार आहे. कचरा वर्गीकरण आणि वाहून नेण्याचे काम कंपनीव्दारेच केले जाणार आहे. या कामासाठी अंदाजे १५ लाख इतका खर्च अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीकडून या प्रकल्पासाठी लागणारी वीज पुरवली जाणार आहे. या प्रकल्पामुळे गांधीनगर येथील  कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.

यावेळी प्रकल्प संचालक (जल जीवन मिशन) प्रियदर्शनी मोरे,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरूण जाधव,   करवीरचे गटविकास अधिकारी  जयवंत उगले, विस्तार अधिकारी संदेश भोईटे,  सरपंच रितू लालवाणी,  ग्रामविकास अधिकारी चंदन चव्हाण,  ग्रा. पं. सदस्य,  कंपनीचे प्रतिनिधी सुरज शिंदे,  निरंजन ठमके,  कौस्तुभ पाटील आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.