कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोटार वाहन कायदा अधिनियमात बदल करण्यात आलाय. नव्या नियमानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर होणाऱ्या कारवाईतील दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्ह्यात उद्या (सोमवार) पासून करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. 

बलकवडे म्हणाले की, नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ करण्यात आली आहे.  विना परवाना वाहन चालवणाऱ्यांना यापूर्वी ५०० रुपये दंड होता. त्यात वाढ करून ५ हजार रुपये करण्यात आली आहे. तर राँग साईडने वाहन चालवल्यास किंवा मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यास,वाहतूक पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यास,चारचाकी वाहनांच्या काचेवर फिल्मिंग केल्यास आता २०० रुपयांऐवजी ५०० रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. तर मोटारसायकलवरून ट्रिपलसीट जात असल्यास किंवा वाहनांना मोठे हॉर्न असल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.

या नवीन नियमांचे गेले आठ दिवस पोलीस दलाकडून प्रबोधन करण्यात आले आहे. उद्यापासून नव्या नियमानुसार दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळं वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तिनं पाळावेत,असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.